सावंतवाडीच्या मोती तलावातील मगर पकडण्यात वनविभागाला अपयश

नागरीकांमध्ये नाराजी : ठोस उपाययोजना करण्याची मागणी

सावंतवाडीप्रतिनिधी : सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक मोती तलावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दिसत असलेल्या मगरीला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही. वनविभागाने लावलेला सापळा निरुपयोगी ठरल्यानंतर रविवारी आणि सोमवारी पुन्हा एकदा मगर तलावात दिसून आली. मात्र, वेळेवर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत, यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गणेशोत्सव सुरू असताना आणि मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन याच ठिकाणी होणार असल्याने, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच वनविभागाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

जलद कृती दलाचा प्रयत्न अयशस्वी

नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर आणि उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी लक्ष घातल्यानंतर सायंकाळी उशिरा वनविभागाच्या जलद कृती दलाने मगरीला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर तसेच तुषार सावंत, शुभम सावंत आणि सिद्धेश नेमळेकर यांच्या पथकाने तलावात उतरून मगरीला पकडण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, माणसाची चाहूल लागताच मगरीने पाण्यात पळ काढल्याने हे रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी ठरले.

*दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये रोष*

रविवारी तब्बल चार तास ही मगर संगीत कारंजावर येऊन बसली होती. त्यावेळी नागरिकांनी वनविभागाला अनेकदा संपर्क साधूनही एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. आजही (सोमवारी) दुपारपासून सायंकाळपर्यंत मगर याच ठिकाणी दिसली. याबाबत उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तरीही, जवळपास एक तासभर घटनास्थळी कोणीही फिरकले नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. वनविभागाचा हा दिखावा असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

*गणेशोत्सवात भीतीचे वातावरण*

सध्या गणेशोत्सव सुरू असून, मोती तलावात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. अशा वेळी मगरीचा वावर नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. रेस्क्यू टीममधील बबन रेडकर यांनी सांगितले की, मगर तिच्या नैसर्गिक अधिवासात आहे आणि माणसाची चाहूल लागताच ती पळ काढते, त्यामुळे लगेच धोका नाही. तरीही, नागरिकांनी काळजी घ्यावी आणि पाण्यात उतरू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. पाण्याची पातळी वाढल्याने मगरीला पकडण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्या पुन्हा एकदा ही टीम मगरीला पकडण्याचा प्रयत्न करणार आहे.

वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दोन दिवसांपासून सतत मगर दिसत असतानाही वनविभागाने तातडीने कार्यवाही केली नाही, यामुळे स्थानिकांनी वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वनविभागाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

 

 

पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने अडचणी : बबन रेडकर

 

जलद कृती दलाचे बबन रेडकर म्हणाले, नैसर्गिक अधिवासात मगर आहे. त्यात पाणी भरल असून पिंजरा लावून देखील ती त्यात येत नाही. माणसाची चाहूल लागताच ती पळ काढते. आताही काही अंतरावर असताना तीने पळ काढला. माणसाला तसा धोका नाही. मात्र, नागरिकांनी पाण्यात उतरू नये, काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. पाण्याच प्रमाण वाढत असल्याने मोठ्या अडचणींना सामोर जाव लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.