मुंबई गोवा जुन्या महामार्गावर भगदाड

ऐन गणेशोत्सवात वाहतुकीची कोंडी

सावंतवाडी । प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सावंतवाडी-मुंबई गोवा जुन्या महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कोलगाव येथील आयटीआयजवळ रस्त्याच्या कडेला मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक सध्या एकेरी करण्यात आली आहे. या अरुंद मार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाल्याने गणेश चतुर्थीसाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुरक्षित आणि वाहतुकीस योग्य बनवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था कायम असून, खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोलगावजवळचे भगदाड हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचाच परिणाम असल्याचे दिसून येत आहे. अचानकपणे रस्त्याचा काही भाग खचल्याने वाहतूक संथ झाली आहे, ज्यामुळे ऐन गर्दीच्या काळात मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

या भगदाडामुळे अर्ध्याहून अधिक रस्ता खचला आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे. या समस्येवर त्वरित तोडगा काढल्यास गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल.