अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
वैभववाडी प्रतिनिधी :
अज्ञात चोरट्याने उपळे येथील सिद्धेश्वर मंदिरातील घंटा चोरून नेल्या आहेत. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली.
उपळे येथील श्री.सिद्धेश्वर मंदिर हे लोक वस्तीपासून दूर अंतरावर सिद्धाच्या राईत आहे. या मंदिरा मध्ये येणारे भाविक हे श्रद्धेने मंदिरास घंटा दान करत असतात. त्यामुळे या मंदिरात अन्य मंदिरांच्या तुलनेत जास्त घंटा आहेत. सध्या या मंदिरात लहान मोठ्या 224 पितळी घंटा होत्या. या मंदिरात यापूर्वीही चोरीचे प्रकार घडले होते.
या मंदिराचे पुजारी अनंत कृष्णा गोसावी रा. उपळे डांगेवाडी हे दर सोमवारी या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करतात. दि. 14 जुलै 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता गोसावी हे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मंदिरात असलेल्या सर्व घंटा सुस्थितीत होत्या. त्यानंतर सोमवार दि. 21 जुलै 2025 रोजी गोसावी हे पुन्हा पूजा करण्यासाठी मंदिरात गेले होते. यावेळी त्यांना काही घंटा कमी असल्याचे जाणवले. यावेळी त्यांनी तपासणी केली असता मंदिरातील एकूण 63 पितळी घंटा कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी खात्री केली असता अज्ञात चोरट्याने या घंटा लंपास केल्याचे दिसून आले.
याबाबत गोसावी यांनी गावातील प्रमुख व्यक्ती असलेल्या विजय जाधव, शैलेंद्र परब, महेश नागले, देवानंद पालांडे व पोलीस पाटील स्वप्निल सकपाळ यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अनंत गोसावी यांनी पोलीस ठाण्यात येऊन घंटा चोरीबाबत रीतसर तक्रार दाखल केली आहे. या दाखल तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भुईबावडा दुरक्षेत्र चे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश भोवड करीत आहेत.
दरम्यान तालुक्यातील मंदिरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी ग्रामस्थांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. घंटा चोरी व दानपेटीतील रक्कम चोरीचे प्रकार घडत आहेत. असे प्रकार होऊ नयेत यासाठी मंदिराचे मानकरी व ग्रामस्थांनी मंदिरामध्ये लाईटची व्यवस्था करून सिसिटीव्ही बसवून घ्यावेत. शिवाय मंदिराच्या बाबतीत जागरूक राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी केले आहे.










