सिंधुदुर्गचे सुपुत्र अमित जामसंडेकर यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून घेतली शपथ,

देवगड महाविद्यालयामध्ये शपथविधीचे सहक्षेपण

सिंधुदुर्गचे सुपुत्र अमित जामसंडेकर यांनी आज उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना शपथ दिली. याचा सहक्षेपण सोहळा देवगड महाविद्यालयात पार पडला. पंचक्रोशीतील अनेक जण हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.

देवगड महाविद्यालयाचे पदाधिकारी व नियामक समितीचे सभापती एकनाथ तेली, संस्थेचे अध्यक्ष जनार्दन तेली व सहसचिव तुकाराम तेली, चंद्रहास मर्गज, प्राध्यापक वर्ग व अन्य उपस्थित होते.

एकनाथ तेली यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, “अमित जामसंडेकर या मातीतच जन्म घेऊन शिक्षण घेऊन न्यायमूर्ती होऊ शकतात. युवकांनी यापासून प्रेरणा घेऊन कार्यरत राहिले पाहिजे. यासाठी लागणारी मेहनत केली पाहिजे. यश तुम्हाला निश्चित मिळेल.”

उपस्थितांमधून एडवोकेट अविनाश माणगावकर, माजी पदाधिकारी प्रमोद नलावडे उपस्थित होते. प्रकाश गोगटे यांनीही आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत शिरसाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कांबळे सर यांनी केले.

कोण आहेत न्यायमूर्ती अमित जामसंडेकर?

आंतरराष्ट्रीय पातळीवर वकिली व्यवसाय अत्यंत जोमात सुरू असताना, फक्त देशाच्या न्यायव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी व सहाय्य करण्यासाठी त्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम पाहणे हे विशेष उल्लेखनीय आहे. उच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती ही त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाची खोली आणि व्यावसायिक सचोटीचा गौरव मानली जात आहे. त्यांचे हे समर्पण आणि कठोर परिश्रम यामुळेच न्यायमूर्ती पदासाठी त्यांची निवड झाली आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

देवगडसारख्या ग्रामीण भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे वडील सत्यवान जामसंडेकर यांनी अनेक वर्षे शिक्षण विकास मंडळ देवगड ही संस्था चालविली. वडीलांच्या अकाली निधनानंतर खचून न जाता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याकडून वारसा घेऊन पवित्र असे शिक्षण क्षेत्र पुढे चालू ठेवले.

अमित जामसंडेकर यांनी शिक्षण विकास मंडळ देवगड संस्थेचे सहा वर्षे सभापती पद भूषविले. त्यांच्या काळात संस्थेने वेगाने प्रगती केली. त्यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतले आणि परिणामी अनेक आव्हानांनाही सामोरे जावे लागले. प्रगल्भ बुद्धिमत्ता व ज्ञानाच्या जोरावर त्यांनी संस्था चालवत असलेल्या महाविद्यालयामध्ये विविध शाखा व विभागांचा विस्तार केला. त्यांच्या कारकिर्दीत संस्थेच्या उच्च महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, अध्यापक महाविद्यालय व सीबीएसई शाळेने वेगाने प्रगती करताना शैक्षणिक आलेख उंचावला.

कला व साहित्य क्षेत्रातील आपली आवड जोपासताना त्यांनी नाटक, सिनेमा व मराठी साहित्यातही योगदान दिले आहे. न्यायमूर्ती श्री. अमित सत्यवान जामसंडेकर यांचे कार्य तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल, यात शंकाच नाही.

नियुक्तीचे महत्त्व : बौद्धिक संपदा विषयातील महाराष्ट्रातील प्रथम न्यायमूर्ती

न्यायमूर्ती श्री. अमित सत्यवान जामसंडेकर हे बौद्धिक संपदा विषयातील महाराष्ट्रातील प्रथम न्यायमूर्ती आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून थेट नियुक्तीने उच्च न्यायालयाचे प्रथम न्यायमूर्ती होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

त्यांची नियुक्ती ही केवळ त्यांच्या वैयक्तिक पात्रतेचा गौरव नसून, न्यायव्यवस्थेची प्रक्रिया अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग न्यायालयातील प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी होईल आणि सामान्य नागरिकांना वेगाने न्याय मिळण्याची आशा बळकट होईल.