चिपळूण (प्रतिनिधी): गणेशोत्सवासाठी गावोगावी आलेले कोकणवासीय गणेश विजर्सनानंतर पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने चिपळूण आगाराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आगार प्रशासनाकडून सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे यंदा कोकणवासियाच्या सेवेसाठी आगाराकडून ग्रुप बुकिंगवर अधिक भर देण्यात आला.
गणेशोत्सव आणि कोकणवासीय हे अनोखे नाते असल्याने या सणानिमित्त मुंबई, पुण्याठिकाणी असलेला बहुसंख्य कोकणवासिय गेल्या सोमवारी गावच्या दिशेने दाखल झाले होते. २७ रोजी जल्लोषात लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर पूजा, आरत्या, भजन तर पारंपरिक कार्यक्रमामध्ये गणेशभक्त तल्लीन झाला होता. लाडक्या बाष्पाच्या मनोभावे सेवेनंतर मंगळवारी सात दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर दाखल झालेला कोकणवासिय मंगळवारी सायंकाळपासून पुन्हा कर्मभूमीकडे निघाला. बुधवारी बहुतांशी कोकणवासिय परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने यावेळी प्रवाशांची झालेली गर्दी लक्षात घेता चिपळूण आगाराला एकप्रकारे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी बसस्थानकातून मुंबईच्यादिशेने निघालेल्या एस.टी बसेस तुडूंब भरून जात होत्या. मंगळवारी ४२ तर बुधवारी १२६ बसेस कोकणवासियांन घेऊन रवाना झाल्या. कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा शिवाय प्रवासादम्यान त्यांची गैरसोय होवू नये यासाठी आगार प्रशासनाने जादा प्रवासी वाहतूक केंद्र, शिवाय स्वतंत्र कर्मचारी तैनात केले होते. एकीकडे कोकणावासियाच्या प्रवासासाठीचे सुसज्ज व्यवस्थापन केले जात असताना दुसरीकडे दुर्लक्षा अभावी ग्रामीण एस.टी फेऱ्यांचे वेळापत्रक मात्र दिवसभर कोलमडले होते. यावेळी या फेऱ्या वीस ते अर्धा तासाचा फरकाने उशिरा सुटत होत्या. विशेष म्हणजे यंदा कोकणवासियाच्या सेवेसाठी आगार प्रशासनाने ग्रुप बुकिंगवर अधिक भर दिला आहे. त्यानुसार गुरुवारपर्यंत ७४ इतक्या बसेस ग्रुपबुकिंग झाल्या असून त्यास कोकणवासियांनी देखील चांगलीच पसंती दिली आहे. यामुळे परतीच्या प्रवासादरम्यान ग्रामीण भागातून बसस्थानकात येणाऱ्या कोकणवासियांचा ओघ कमी झाला आहे.