दापोलीत विसर्जन मिरवणुकीत मोराची सरप्राईज एन्ट्री

व्हिडिओ व्हायरल

दापोली | राकेश कोळी

दापोली तालुक्यातील पोफळवणे बेलवाडी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत अविस्मरणीय प्रसंग घडला. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीदरम्यान अचानक रस्त्यावर एक सुंदर मोर आला.

हा मोर चक्क मिरवणुकीच्या मधोमध उभा राहिला आणि इकडे तिकडे बागडू लागला. त्याचे देखणे रूप पाहून विसर्जन मिरवणुकीतील नागरिक भारावून गेले. मुलांनी ‘अरे नाच नाच’ अशी हाक मारल्यावर मिरवणुकीचा उत्साह अधिकच वाढला. बाप्पाला निरोप देण्यासाठी मोरराज स्वतःच आल्याचा अनुभव घेतल्यामुळे गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

शेवटी नागरिकांनी त्याला “जा रे” अशी विनंती केली, त्यावर मोराने एक मोठा सूर काढला आणि जवळच्या घराच्या छतावर उडून गेला. त्यानंतर विसर्जन मिरवणूक पुढे निघाली.

हा संपूर्ण प्रसंग पोफळवणे येथील उमेश भरत बेंडकर यांनी मोबाईलमध्ये टिपला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिरवणुकीत दिसलेल्या मोराची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.