चिपळूण (वार्ताहर):
तालुक्यातील बामणोली येथे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गौरी गणपतींना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोष करण्यात आला. यावेळी वरुण राजाने विश्रांती घेतल्याने गोविंडा नदीवर लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.
तालुक्यातील बामणोली गावात गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन घरोघरी झाले. बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मकर सजावट आणि विद्युत रोषणाई करून प्रत्येक गणेश भक्त प्रसन्न मनाने गणरायाच्या सेवेत तल्लीन झाला. दरदिवशी भक्तीभावे आरती, भजन, जाखडी, महिलांचे टिपरी नृत्य असे कार्यक्रम झाले. यामुळे तालुक्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. घरोघरी आरत्यांचे सूर घुमत होते. सहा दिवस लाडक्या गणरायाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर जड अंतकरणाने मंगळवारी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
गोविंडा नदीवर चार वाडीमधील गणपतींचे विसर्जन केले जाते. यावर्षी प्रथम आदर्श मित्र मंडळ पश्चिम वनेवाडी यांनी बाप्पाला निरोप दिला. त्यानंतर पूर्व वनेवाडी येथील मंडळाचे गणपती विसर्जनासाठी वाजत गाजत निघाले. त्यांच्या मागोमाग श्री मुजवेश्वर मित्र मंडळ गवळवाडी यांचेही सर्व गणपती मिरवणूक काढत पुढे पुढे सरकत होते. त्यानंतर नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी यांच्या गणपतीचे आगमन वाजत गाजत झाले. एका मागोमाग सर्व वाड्यांचे गणपती विसर्जनाची जात होते आणि शेवटी तरुण उत्कर्ष मंडळ पश्चिम वनेवाडी यांचे गणपती विसर्जनासाठी आले. चारही वाड्यांचे लागोपाठ गणपती विसर्जनासाठी गोविंडा नदीवरती आल्याने गणेश भक्तांची गर्दी झाली होती. मात्र वरुण राजाने विश्रांती घेतल्याने गणेश भक्तांना विसर्जन करण्यासाठी आणि मिरवणूक करण्यासाठी वेळ मिळाला होता. प्रथम ज्या क्रमाने गणपती विसर्जन दाखल झाले. त्याप्रमाणे विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर पुलावरती जाखडी नृत्याचा फेर महिला व पुरुष यांनी धरला. त्याच्यामुळे अतिशय संगीतमय वातावरण झाले. मात्र तरीसुद्धा बाप्पाला निरोप देताना भक्तांचे अंतकरण जड होते.













