राजापूर प्रतिनिधी: तालुक्यात गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी राजापूर आगाराने सुयोग्य असे नियोजन करत चाकरमान्यांची चांगली सोय केली आहे. गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर चाकरमानी मुंबईकडे जाऊ लागले असून बुधवारी राजापूर आगारातुन १४२ तर गुरूवारी ५२ जादा गाडया रवाना करण्यात आल्या आहेत. चांगल्या प्रकारे नियोजन करत चांगली सेवा दिल्याबद्दल प्रवाशांतुनही राजापूर आगार प्रशासनाला धन्यवाद देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवासाठी तालुक्यात मोठया प्रमाणावर दाखल झालेल्या चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाचे आगाऊ आरक्षण केले आहे. राजापूर आगारातुन मुंबई, ठाणे, कल्याण, बोरिवली, नालासोपारा, विरार या मार्गावरील जादा गाडयांचे प्रवाशांनी मोठया प्रमाणावर आरक्षण केले आहे. तसेच अनेक गावातुन ग्रुप आरक्षण करून एसटी बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची एकच झुंबड आगारात दिसून येत आहे.
राजापूर आगारातुन मंगळवारी २ सप्टेंबर रोजी २ तर सर्वाधिक म्हणजे १४२ गाडया या बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सोडण्यात आल्या. तर गुरूवार ४ सप्टेंबर रोजी ५२ जादा गाडया सोडण्यात आल्या. शुक्रवारु ५ सप्टेंबर रोजी ४, शनिवार ६ सप्टेंबर रोजी ३ रविवार ७ सप्टेंबर रोजी ५ गाडया सोड ण्यात येणार आहेत.
राजापूर आगार प्रमुख अजित गोसार्डे, कार्यशाळा अधिक्षक प्रकाश झोरे यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी यासाठी नियोजन करत आहेत.











