देवरुख येथे गणपती विसर्जनादरम्यान दोन तरुण बुडता-बुडता वाचले

देवरुख : देवरुख शहरातील सप्तलिंगी नदीपात्रात गणपती विसर्जन करताना दोन तरुण बुडता-बुडता बचावले. बुधवारी (४ सप्टेंबर) सायंकाळी उशिरा ही घटना घडली. सहकाऱ्यांच्या धाडसामुळे दोघांचे प्राण वाचले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहर परिसरातील गणपतींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात सप्तलिंगी नदीपात्रातील मच्छीमार्केट परिसरात केले जाते. विसर्जन केलेले गणपती अनेकदा झाडाझुडपांमध्ये अडकून राहतात. त्यांना दुसऱ्या दिवशी पाण्याच्या आत गेलेले तरुण बाहेर काढण्याचे काम करतात. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अशाच प्रकारे काही तरुण गणपती सोडवण्यासाठी नदीपात्रात उतरले होते.

दरम्यान, अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे आशय बारटक्के हा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी सुबारे या तरुणाने पाण्यात उडी घेतली. मात्र, आशयला वाचवताना सुबारे हाही प्रवाहात अडकला.

क्षणाचाही विलंब न लावता इतर सहकाऱ्यांनी दोघांनाही बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने दोघांचेही प्राण वाचले आहे.