गणेशोत्सव सजावट स्पर्धेत ‘ऑपरेशन सिंदूर’ला विजेतेपद

उमराठ येथील किशोर राणे प्रथम क्रमांक विजेता
गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या युवक समितीच्या वतीने आयोजन

अडूर | वार्ताहर :

गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर (रजि.) यांच्या युवक समितीच्या वतीने यंदा प्रथमच तालुकास्तरीय घरगुती गौरी-गणपती सजावट ऑनलाईन स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या या उपक्रमाला तालुकाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून एकूण ५३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री.किशोर यशवंत राणे (गाव- उमराठ) यांनी मिळविले. त्यांनी साकारलेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हा देखावा विशेष ठरला. आपल्या सशस्त्र दलातील जवानांची कार्यशैली, राष्ट्रभक्ती आणि त्याग यांचे दर्शन घडवणारा हा देखावा गणेशभक्तांसाठी प्रेरणादायी ठरला. भक्तीभावासोबत देशप्रेमाचा संदेश देत पारंपरिक गणेशोत्सव सजावटीला नवे रूप देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. द्वितीय क्रमांक कु.अथर्व प्रकाश रहाटे (गाव- गुहागर) यांनी मिळवला. त्यांचा ‘अवकाशात अधांतरी गौरी गणपती’ हा अभिनव देखावा विज्ञान कथेसारखा भासत होता. गणपती बाप्पा व गौरी अवकाशात विहरताना दाखवून त्यांनी श्रद्धा आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घातली. तृतीय क्रमांक विभागून दोन स्पर्धकांना देण्यात आले. श्रीमती चंद्रभागा रामचंद्र किर्वे (गाव- वरवेली) यांनी निसर्गातून सहज उपलब्ध वस्तू वापरून इको-फ्रेंडली सजावट केली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांच्या सादरीकरणातून अधोरेखित झाला. तसेच कु. सौरभ लवु पवार (गाव – धोपावे) यांनी “कोकणातील मापाचं घर काळाच्या ओघात हरवलेलं सुख” या सजावटीतून त्यांनी केवळ एक वास्तुशिल्पच नव्हे तर त्या घराशी जोडलेलं साधं, समाधानी आणि निसर्गाशी एकरूप असलेलं जीवन मांडण्याचा प्रयत्न केला.

या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप प्रथम क्रमांक भेटवस्तू – गुहागर तालुका तेली समाज युवक समिती यांसकडून, द्वितीय क्रमांक भेटवस्तू श्री सचिन मधुकर किर्वे (वरवेली), तृतीय क्रमांक भेटवस्तू श्री विश्वनाथ बाबू रहाटे (गुहागर), तृतीय क्रमांक भेटवस्तू श्री संदिप प्रभाकर रहाटे (गुहागर), सन्मानचिन्ह श्री प्रशांत प्रभाकर रहाटे (गुहागर), प्रशस्तीपत्र श्री वैभव विश्वनाथ पवार (वेळास) यांच्याकडून प्राप्त झाले. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण श्वेता देशपांडे (पुणे) यांनी पाहिले.

गणेशोत्सव हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग असून भक्तीभाव आणि उत्साहाने तो घराघरात साजरा होतो. हाच भाव पुढे नेत या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी घरातील बाप्पा व गौरीच्या सजावटीचे फोटो व व्हिडिओ आयोजकांकडे पाठवले. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड, कलात्मकता, सामाजिक संदेश आणि तरुणाईची कल्पकता या स्पर्धेतून झळकली. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी तालुका युवक समितीचे विशेष सहकार्य लाभले.