गावोगाव विकासाला नवी गती : दापोली तालुका कार्यशाळेचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उदघाटन 

दापोली (राकेश कोळी) : गावांची प्रगती आणि सर्वांगीण विकास हीच खरी ताकद आहे, या भावनेतून ग्रामविकास व पंचायत विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दापोली येथे तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते झाले.
यावेळी मुखधिकारी वैधही रानडे, प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना घोलप-बोंबे, दापोली गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, मंडणगड गटविकास अधिकारी सुनील खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध योजना, विकास आराखडे आणि लोकसहभागाची गरज यावर मार्गदर्शन करण्यात आले. गावोगाव पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हाव्यात यासाठी योजनांचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, “गावच्या विकासात प्रत्येक ग्रामस्थाचा हातभार महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायतींनी पारदर्शक पद्धतीने काम केल्यास गाव समृद्ध होईल आणि समृद्ध गावांमुळे महाराष्ट्रही प्रगतीपथावर जाईल.” या कार्यशाळेला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावपातळीवरील विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.