लांजा तालुक्यात बिबट्याचा हल्ला; चार बोकड व आठ शेळ्या ठार

लांजा :

लांजा तालुक्यातील हसोळ गावात शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) पहाटे बिबट्याने गोठ्यात घुसून हल्ला चढवला. या हल्ल्यात चार बोकड आणि आठ शेळ्या ठार झाल्या असून शेतकऱ्यांचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, किशोर वसंत आगरे (रा. अडवली) आणि सचिन अनंत कांबळे (रा. हसोळ) यांच्या शेळ्या हसोळ येथे सचिन कांबळे यांच्या घरापासून सुमारे २०० मीटर अंतरावरील गोठ्यात बांधल्या होत्या. शनिवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने या गोठ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चार बोकड व आठ शेळ्या मृत्युमुखी पडल्या.

या घटनेची माहिती गोठ्याचे मालक किशोर आगरे यांना तात्काळ मिळाली नव्हती. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. ७ सप्टेंबर) सचिन कांबळे तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांकडे गेले होते. दुपारी ते हसोळ येथे परत आले आणि शेळ्यांना चरायला सोडण्यासाठी गेले असता गोठ्यातील जनावरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

या हल्ल्यात शेतकऱ्यांचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.