व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखू, विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारू – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई :
“गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान म्हणजेच व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या व्हिजननुसारच पुढील धोरणे आखली, तर २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्राचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जलसंपदा, ऊर्जा, शिक्षण, सामाजिक न्याय, उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान, वित्त, आरोग्य, पर्यटन आदी विषयांवरील व्हिजनचे सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सादरीकरणामध्ये डीप थिंकिंग दिसून आले आहे आणि आपण योग्य दिशेने वाटचाल करतो आहोत. “व्हिजन म्हणजे दिशा. फक्त कागदोपत्री योजना न राहता प्रत्यक्षात ते साध्य व्हावे, यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावली पाहिजे. पुढील पाच वर्ष सातत्याने काम केले, तर महाराष्ट्राला विकसित राज्य बनविण्याचे स्वप्न साकार होईल,” असे ते म्हणाले.

त्यांनी सहकार क्षेत्रावर विशेष लक्ष द्यावे, उत्तम प्रशासनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा, भारत नेट रिंग लवकरात लवकर विकसित करावी, तसेच सायबर सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य घ्यावे, असेही निर्देश दिले. शैक्षणिक संस्था व विद्यापीठांची गुणवत्ता वाढविण्यावर त्यांनी भर दिला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “बावीस वर्षांनंतर महाराष्ट्र कसा असावा, याचे स्पष्ट चित्र या व्हिजनमध्ये आहे. मोठी स्वप्ने ठेवल्याशिवाय मोठी प्रगती शक्य नाही. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवणे हेच या आराखड्याचे वैशिष्ट्य आहे.”

बैठकीत ‘विकसित महाराष्ट्र व्हिजन २०४७’ ही योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात कार्यान्वित होईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या आराखड्यामुळे पुढील दोन दशकांत महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगती गतीमान होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.