रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा : साडेदहा कोटींचे नुकसान

रत्नागिरी :
मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात शेती, घरे, गोठे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत एकूण ₹१० कोटी ६२ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान ३ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी झाले असून १२ जनावरे दगावली आहेत.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसासोबत वादळी वाऱ्याचा जोर वाढल्याने घरे, दुकाने, गोठे आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील ३९२ शेतकऱ्यांची ११९.७३ हेक्टरवरील शेती बाधित झाली असून त्याचे नुकसान ₹१०.४९ लाखांपर्यंत पोहोचले आहे. हवामान खात्याने पुढील दिवसांतही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील नुकसानाचा तपशील (मे – ऑगस्ट अखेरपर्यंत):

  • बाधित घरे – ४३८ : ₹३.५१ कोटी

  • बाधित गोठे – ९४ : ₹४१.७१ लाख

  • शाळा – १५ : ₹२७.४० लाख

  • अंगणवाडी – ३ : ₹४.६८ लाख

  • रस्ते व संरक्षक भिंती – ३९ : ₹२.७६ कोटी

  • पूल व मोऱ्या – ६ : ₹६.६० लाख

  • साकव – ६ : ₹१.४५ कोटी

  • इमारती – ९ : ₹५.७२ लाख

  • विहिरी – ४ : ₹७.५० लाख

  • महावितरण यंत्रणा – ₹३६.२२ लाख (५६ यंत्रणा, ५२ पोल, ४ रोहित्र)

  • शेती – ११९.७३ हेक्टर : ₹१०.४९ लाख

जिल्ह्यात अजूनही पावसाचे सातत्य सुरू असल्याने नुकसानाची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.