प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर : वैद्यकशास्त्रात नवनव्या आणि काही वेळेस अतिशय दुर्मिळ अशा घटना घडत असतात. अशीच एक वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना समोर आली आहे. आतापर्यंत आपण २१ किंवा २२ बोट असलेलं बाळ जन्माला आल्याचं ऐकलं असेल. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील ठिकपूर्ली ग्रामीण रुग्णालयात तब्बल २४ बोटे असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या नवजात बाळाला दोन्ही हाताला एक- एक अन् दोन्ही पायाला एक – एक बोटे जास्त आहेत. नवजात बाळ व बाळाची आई दोघांचीही प्रकृती सुखरूप आहे. ही वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
जिल्हयातील सावर्डे (पा.) ता
राधानगरी येथील रहिवासी असलेल्या सुजाता कांबळे या २७ वर्षीय महिलेला शनिवारी मध्यरात्री ठिकपूर्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने गरोदर मातेची वैद्यकीय तपासणी केली व परिश्रम घेऊन सुजाता कांबळे हिची पहाटे यशस्वी प्रसूती केली.
जन्माला आलेल्या या बाळाला पाहून उपस्थित सर्वच अवाक झाले कारण या बाळाच्या हातापायाला तब्बल २४ बोटे होती. सामान्यतः आपल्या हातापायाची मिळून २० बोटे असतात मात्र या नवजात बाळाला मात्र चक्क २४ बोटे आहेत.
या नवजात बालकाच्या दोन्ही हाताल पायाला प्रत्येकी सहा बोटे आहेत.या बालकाला पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. सद्यस्थितीत माता व बालक या दोघांची प्रकृती ठणठणीत आहे.












