खेड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेला वेग; एका दिवसात ४० उमेदवारी अर्ज दाखल

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरू असून आज मंगळवार, २० जानेवारी रोजी विविध राजकीय पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी, खेड यांच्याकडे सादर केले. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे.
पंचायत समिती निवडणुकीसाठी आज एकूण २९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुकवली गणातून सायली संजय गोमले, तिसंगी गणातून किशोर गणेश जाधव, दयाळ गणातून स्वाती परेश कदम, गुणदे गणातून विष्णू शंकर आंब्रे, लोटे गणातून अजय चंद्रकांत चाळके व नितीन श्रीराम कडू, अंबडस गणातून अमिता समीर बने तसेच बहिरवली गणातून बशीर हमदुले व सईद हसन हमदुले यांनी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भरणे गणातून नामदेव बाळू हेळगावकर, भडगाव गणातून कुलदीप पवार, दयाळ गणातून सबिह रियाज दुसुके, जामगे गणातून अपूर्वा हर्षल जाधव, गुणदे गणातून रत्नाकर कारेते आणि विराचीवाडी गणातून उमेश देवरुखकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. भाजपाकडून भरणे गणातून निलेश बामणे, विराचीवाडी गणातून मधुकर रामचंद्र शिंगे, तर बहिरवली गणातून खालिद परकार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. याशिवाय काँग्रेस पक्षाकडून अजीम सुर्वे, शिवसेना पक्षाकडून निसार जाफर सुर्वे आणि शहानवाज सुर्वे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, आरक्षण यादीनुसार खेड पंचायत समितीमध्ये एकूण १४ जागा असून त्यापैकी ७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तसेच अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण निश्चित करण्यात आले असल्याने अनेक गणांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सुकवली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक निकम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामचंद्र बाबू आखाडे यांनी अर्ज दाखल केले. दयाळ गटातून शिवसेना पक्षाचे माजी जिल्हा परिषद सभापती अरुण उर्फ अण्णा कदम आणि उबाठा पक्षाकडून अजिंक्य मोरे यांनी आपली उमेदवारी दाखल केली.
विराचीवाडी गटातून राष्ट्रवादीच्या अंजली खापरे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या स्पृहा चांदीवडे, धामणदेवी गटातून राष्ट्रवादीच्या सानिका सचिन आंब्रे आणि उबाठा पक्षाच्या प्रीती प्रभाकर मनवळ, तर लोटे गटातून शिवसेना पक्षाकडून अदिती दीपक खाडे आणि उबाठा पक्षाकडून अंकिता अक्षय सोलकर यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी खेड यांच्याकडे सादर केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या प्रक्रियेमुळे खेड तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून येत्या काही दिवसांत आणखी उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.