रत्नागिरीच्या अविराज गावडेची इंग्लंड दौऱ्यात शतकी खेळी; सहाव्यांदा सामनावीराचा किताब

रत्नागिरी :

रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत शेवटचा सामना गाजवला. मिडलसेक्स पेशवा संघाकडून खेळताना त्याने जोरदार फलंदाजी करत नाबाद 110 धावांची शतकी खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

शनिवारी झालेल्या रिजेंट्स पार्कविरुद्धच्या सामन्यात मिडलसेक्स पेशवा संघाने 45 षटकांत 256 धावांचा डोंगर उभारला. त्यामध्ये अविराजने 112 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 110 धावा केल्या. स्ट्राईक रेट 98.21 अशी भक्कम कामगिरी त्याने साकारली.

प्रत्युत्तरादाखल रिजेंट्स पार्क संघ 146 धावांत गारद झाला. या डावात अविराजने 5 षटके टाकत 1 बळी घेतला. त्याच्या ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावर त्याला या सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे, ही स्पर्धेत अविराजची सहावी वेळ ठरली आहे की त्याने सामनावीराचा किताब पटकावला.

अविराजला इंग्लंडमध्ये चार महिन्यांसाठी मिडलसेक्स संघाकडून करारबद्ध करण्यात आले होते. या काळात त्याने फलंदाजीसोबतच फिरकी गोलंदाजीतही लक्षणीय कामगिरी करून इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर आपली छाप पाडली.

अविराज गावडे 11 सप्टेंबरला भारतात परतणार असून, त्याच्या सातत्यपूर्ण चमकदार खेळीमुळे आता इंग्लंडमधील विविध नामांकित क्लबकडून त्याला पुढील मोसमासाठी ऑफर आल्या आहेत.

रत्नागिरीच्या या क्रिकेटरत्नाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, रत्नागिरीकर व क्रिकेटप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे.