चिपळूण (प्रतिनिधी) : आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कॉग्रेसने येथे सोमवारी आयोजित केलेल्या शिबिरात लोकापर्यंत पोहोचा आणि संघटनेची मजबूत बांधणी करा, असा सल्ला जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग व नुरूद्दीन सय्यद यांनी दिला. शहरातील धवल प्लाझाच्या सभागृहात उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच सर्व पदाधिकाऱ्यांची महत्वपुर्ण बैठक आयोजित केली होती.
या बैठकीच्या सुरवातीला घाग यांच्या हस्ते दिपप्रज्वन करण्यात आले. यावेळी दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद, जिल्हा समन्वयक सुरेश कातकर,तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. निर्मला जाधव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह, सूर्यकांत चिपळूणकर, अशोक भुस्कुटे, माजी नगरसेविका सौ. सफा गोठे, सौ. अश्विनी भुस्कुटे, सौ. वीणा जावकर, यशवंत फके आदी या बैठकीला उपस्थित होते. प्रामुख्याने या बैठकीत संपुर्ण जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्या संदर्भात तालुकानिहाय चर्चा करण्यात आली. तसेच त्या-त्या तालुकाध्यक्षांवर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. याशिवाय लवकरच तालुकानिहाय बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले. येत्या काही महिन्यात नगरपरिषद निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी बुथ कमिट्या अधिक बळकट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर प्रदेश कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी संदर्भात देखील पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी आढावा बैठकीबरोबरच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरातून काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटनात्मक वाढीसंदर्भात माहिती मिळाली. या नियोजनाबद्दल सोनललक्ष्मी घाग यांचे उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार मानले. तर या सर्वांनी आगामी काळात काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा निर्धार केला.