बांदा येथे होणार बैठक
बांदा l प्रतिनिधी :राज्य शासनाने नुकतीच काजू बोर्ड कार्यकारणी जाहीर केली आहे. यात काजू उत्पादक शेतकऱ्यांना डावलून राजकीय लोकप्रतिनिधींना स्थान दिले आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून उद्या गुरुवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता बांदा गडगेवाडी येथे दुध संस्था कार्यालयात शेतकऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. काजू पिकाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनांचा शासकीय पातळीवर संघर्ष सुरू आहे. शासनाने अलीकडेच काजू बोर्ड स्थापन करून राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांना कार्यकारणीत स्थान दिले आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कार्यकारणीतून डावलण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
काजू बोर्ड कार्यकारणीत शेतकरी प्रतिनिधींचा समावेश व्हावा या मागणीसाठी उद्याच्या बैठकीत निर्णय होणार आहे. शेतकऱ्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा फळबागायतदार संघटनेमार्फत करण्यात आले आहे.










