दोडामार्ग l सुहास देसाई :दोडामार्ग तालुक्यातील घोटगे आणि पाळये गावांमध्ये हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत. वनविभागाचे कर्मचारी, वनरक्षक आणि ‘हाकारी’ पथक त्यांच्या कामात हलगर्जीपणा करत असल्याने हत्तींची दहशत वाढत असून, शेती आणि बागायतींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घोटगे येथील प्रगतशील शेतकरी संतोषकुमार दळवी यांनी या संदर्भात उपवनसंरक्षक, सावंतवाडी यांच्याकडे तक्रार केली असून, या बेजबाबदारपणाची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घोटगे गावात संतोषकुमार दळवी यांची मोठी शेती आणि बागायती आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्या बागायतीमध्ये नारळाची झाडे, बांबूची बेटे आणि सौर ऊर्जेच्या कुंपणाचे हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या नुकसानीची दखल घेतलेली नाही किंवा पंचनामेही केले नाहीत, असे दळवी यांचे म्हणणे आहे.
‘हाकारी’ पथक नावालाच?
मागील मध्यरात्री पुन्हा एकदा हत्तीने दळवी यांच्या बागेत धुमाकूळ घालून मोठे नुकसान केले. त्यावेळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हते, एवढेच नव्हे तर त्यांना हत्तींचे नेमके स्थान (location) देखील माहीत नव्हते. वनकर्मचारी आणि ‘हाकारी’ पथक हत्तीच्या फिरण्याचा मार्ग मोडून घटनास्थळापासून दोन किलोमीटर दूर एका कालव्याच्या कडेला बसून होते. जर त्यांनी वेळेत गस्त घातली असती, तर हे नुकसान टाळता आले असते, असे दळवी यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंतही हे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वनकर्मचारी आणि ‘हाकारी’ पथक आपले काम सोडून कालव्याच्या कठड्यावर बसून टिंगल-टवाळी करण्यात किंवा घोटगेवाडी येथे वेळ घालवण्यात व्यस्त असतात. वेळेत घटनास्थळी न पोहोचल्यामुळे नुकसान वाढले आहे.
भ्रष्टाचाराचा आरोप
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी कृषी, महसूल आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त पंचनामे करणे आवश्यक असताना, कार्यरत वनरक्षक एकटाच आपल्या मर्जीप्रमाणे बेकायदेशीर पंचनामे करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोपही दळवी यांनी केला आहे. तसेच, वनपाल यांना गस्तीसाठी दिलेली वाहने आणि मनुष्यबळाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ते स्वतः हत्तीच्या ठिकाणावर वेळेत हजर राहत नाहीत आणि ‘हाकारी’ पथकाला योग्य निर्देश देत नाहीत, असेही तक्रारीत नमूद आहे.
सरकारी सोयीसुविधांचा गैरवापर
वनविभागाला शासनाकडून मिळणाऱ्या अनेक सोयीसुविधांचा गैरवापर होत आहे. हत्तीप्रवण क्षेत्रात मोक्याच्या ठिकाणी सौर ऊर्जेवरील दिवे लावणे आवश्यक असताना, ते चुकीच्या जागी लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, हत्तीबाधित शेतकऱ्यांना रात्रीच्या गस्तीसाठी देण्यात येणाऱ्या बॅटऱ्याही पोहोचल्या नाहीत. ड्रोनद्वारे हत्तीचे लोकेशन मिळवून नागरिकांना वेळेवर सतर्क केले जाऊ शकते, परंतु ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे तेच बेजबाबदार वागत आहेत. अशा परिस्थितीत ‘कुंपणच शेत खात असल्याचा’ प्रकार सुरू असल्याचा संताप दळवी यांनी व्यक्त केला आहे.
या सर्व गंभीर बाबींची तात्काळ दखल घेऊन योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतोषकुमार दळवी यांनी केली आहे.









