” राधाss राधाकृष्णsss राधा sss”

कृष्णनामात फोंडा बाजारपेठ चिंब

श्रीदेव राधाकृष्ण मंदिरातील “अखंड हरिनाम सप्ताह” चा घटस्थापनेने उदंड उत्साहात शुभारंभ !

बालगोपाळांचे कौतुकास्पद नियोजन !

 

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी— गेले दोन-तीन दिवस बालगोपाल मंडळातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आणि नियोजनांच्या बैठकांना उधाणआले होते. अखेर तो चैतन्याचा दिन उजाडला. मंदिराची स्वच्छता, आकर्षक कमानी,बाजारपेठ व मंदिराला मनमोहक विद्युत रोषणाई आणि आवश्यक सामग्रीची जमवाजमव ! सकाळपासूनच लगबग सुरू होती. पूजाअर्चा झाल्यावर, कामतेकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ठीक दहा वाजता घटस्थापना विधिवत पार पडली.पंचक्रोशीचे मानकरी यांनी सर्वांच्या स्वास्थ्यासाठी, समृद्धीसाठी, कार्यक्रम यशस्वीतेसाठी खड्या आवाजात सांगणे (गाऱ्हाणे )केले. मारुती मेस्त्री व त्यांच्या वारकरी संप्रदायातील सदस्यांनी श्रीराधा कृष्णाच्या नाम संकीर्तनाची सुरुवात जयजयकाराने केली. मृदंग, टाळ, ढोल ताशांच्या निनादात, फटाक्यांची एकच आतषबाजी झाली. पारकर यांनी वीणा धारण करून तार नामस्मरणाने झंकारली .आता पुढील सात दिवस ही वीणा अहोरात्र राधाकृष्णाच्या नामस्मरणात वेगवेगळ्या भाविकांच्या उपस्थितीने मग्न राहणार आहे…

 

 

 

 

त्यामुळे पुढील सात दिवस फोंडा बाजारपेठ गजबजणार असून, मंदिरामध्ये विविध सामाजिक, समाज प्रबोधनात्मक, धार्मिक सांस्कृतिक तसेच आर. के. ग्रुपच्या अभिनव भजन स्पर्धा, श्रेष्ठ बुवा च्या डबलबारी, स्थानिक भजन मंडळ ची भजने, शाळांची सांस्कृतिक कार्यक्रम व चित्ररथ,महिलांसाठी विविध कार्यक्रम, बालगोपाळ मंडळाचे विविध उपक्रम यांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण असेल. मंदिरामध्ये माहेरवाशीणी,परगावचे भावीक यांचा राबता राहणार आहे. यासाठी समाजाचे पदाधिकारी व बालगोपाळ कार्यरत आहेत…