ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर पलटी होऊन अपघात, हातखंबा पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले चालकाचे प्राण

मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी येथील घटना

लांजा (प्रतिनिधी) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चे आंजणारी घाटातील तीव्र उतारात ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर थेट महामार्गा लगतच्या दरडीवर जाऊन धडकला आणि महामार्गावर पलटी झाला. या भीषण अपघातामध्ये चालक सलीम मेवती हा गंभीर जखमी झाला होता.महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास घडला.
​ याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सलीम मेवती हे आपल्या ताब्यातील मालाने भरलेला कंटेनर घेऊन जात असताना अंजनारी पुलाजवळ अचानक कंटेनर ची ब्रेक फेल झाले. महामार्गावरील मोठा अपघात टाळण्याच्या प्रयत्नात कंटेनर थेट शेजारील डोंगराला धडकला. या धडकेमुळे कंटेनर महामार्गाच्या मधोमध उलटला, ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.

​ घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तातडीने रुग्णवाहिकेने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, ज्यामुळे चालकाला वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली.​त्यानंतर महामार्गावर मधोमध पडलेला आणि वाहतुकीस अडथळा ठरणारा कंटेनर पोलिसांच्या पथकाने क्रेनच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाजूला हटवला आणि ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.

​ महामार्ग पोलिसांच्या या अत्यंत सतर्क आणि कौतुकास्पद कामगिरीत API /घुले, पोलीस शिपाई जाधवर, पोलीस शिपाई अनिल शिंगाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश जाधव आणि पोलीस हवालदार योगेश दोरखंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी वाहनांची गती कमी करण्यासाठी बॅरल ठेवण्यात आले आहेत. मात्र हेच बॅरल सध्या वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरत आहेत. अपघात स्थळापासून काही अंतरावर खालील भागात लोकवस्ती आहे. अनेकदा होणारे अपघातातील वाहन रहिवाशांच्या घरामध्ये घुसण्याचा धोका संभवतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांतून केले जात आहे.