अध्यक्ष संजय ओगले व सीईओ शेखरकुमार अहिरे यांची माहिती
सहकार आयुक्त व सहकार निबंधकांकडून मे. संजय मालपाणी एन्ड असोसिएटने दिलेला ड वर्ग रद्द
राजापूर | प्रतिनिधी : येथील राजापूर अर्बन को. ऑप. बँकेच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षणांती मे. संजय मालपाणी एन्ड असोसिएटस (सनदी लेखापाल) यांनी कॅमल रेटींग अंतर्गत दिलेला ड वर्ग अयोग्य ठरवत सहकार आयुक्त व सहकार निबंधक सहकारी संस्था पुणेचे दिपक तावरे यांनी बँकेला ब वर्ग दिला आहे. तशी माहिती बँकेचे अध्यक्ष संजय ओगले व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे यांनी दिली आहे. सहकार आयुक्त व सहकार निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या या निर्णयामुळे राजापूर अर्बन बँकेला दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणी राजापूर अर्बन बँकेने मे. संजय मालपाणी एन्ड असोसिएटस (सनदी लेखापाल) यांनी लेखापरिक्षणांती कॅमल रेडींग अंतर्गत दिलेल्या ड वर्गाबाबत सहकार आयुक्त व सहकार निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे पुर्ननिरीक्षणासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सहकार आयुक्त व सहकार निबंधक दीपक तावरे यांच्यापुढे सुनावणी होऊन सहकार आयुक्त व सहकार निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी मे. संजय मालपाणी एन्ड असोसिएटस (सनदी लेखापाल) यांनी लेखापरिक्षणांती कॅमल रेडींग अंतर्गत दिलेला ड वर्ग चुकीच्या पध्दतीने दिल्याचे नमुद करत बँकेला ब वर्ग दिला आहे. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूर जि. रत्नागिरी या बँकेस सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक यांनी दिलेला “ड “वर्ग यामध्ये सुधारणा करुन “ब “वर्ग देण्यात येत आहे. असे आदेश दीपक तावरे यांनी दिले आहेत.
राजापूर अर्बन बँकेचे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षणांती बँकेने नियुक्त केलेल्या मे. संजय मालपाणी एन्ड असोसिएटस (सनदी लेखापाल) यांनी केले होते. त्यांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेची तपासणी करून बँकेला ड वर्ग दिला होता. त्यामुळे बँकेचा दर्जा घसरून बँकेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या विरोधात राजापूर अर्बन बँकेकडून सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे यांच्याकडे वर्गवारी पुर्ननिरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी होऊन हा निर्णय आला आहे.
या प्रकरणी बँकेने सनदी लेखापाल संजय पवार यांची नियुक्ती करून आपले सन २०२४-२५ चे पुन्हा लेखापरिक्षण करून घेतले होते व त्या लेखा परिक्षणात मे. संजय मालपाणी अॅन्ड असोसिएट्स् यांनी केलेले लेखापरिक्षण व दिलेला ड वर्ग चुकीच्या पध्दतीने दिला असल्याचे आढळून आल्याने बँकेकडून अशा प्रकारे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे यांच्याकडे पुर्ननिरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला होता असे ओगले व अहिरे यांनी सांगितले.
मे. संजय मालपाणी अॅन्ड असोसिएट्स् या फर्मला बँकेने सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण कामी नियुक्त केले होते. सदर फर्मने आर.बी.आय यांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करून, संपूर्ण कागदपत्रांची तपासणी न करता एम.ओ.सी द्वारे ४३ कर्ज खात्यांमध्ये अपहार नमूद करून व ३९ कर्ज खाती बुडीत गृहीत धरून बँकेस एकूण रु. ६.१८ कोटी इतक्याजादा रकमेचीएन.पी.ए तरतूद करण्यास सूचित करून लेखापरीक्षण वर्ग ‘ड’ देण्यात आलेला आहे. दि.३१.०३.२०२५ रोजी सुधारित नफा-तोटा पत्रकानुसार केवळ रु. ५,०८,९९८/- एवढी एन.पी.ए खात्यावरील वसूल न झालेल्या व्याजाची तरतूद आवश्यक आहे. त्या रकमेची तरतूद विचारात घेता दि. ३१.०३.२०२५ अखेर बँकेला रु.१,७५,७८,९५३/- एवढा सुधारित नफा दिसून येतो. सदर सुधारित नफा विचारात घेता बँकेच्या कॅमल रेटींग मध्ये सुधारणा होऊन मिळावी असे आपल्या पुर्ननिरीक्षक अर्जात नमुद करत अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणी सहकार आयुक्त व सहकार निबंधक सहकारी संस्था पुणेचे दिपक तावरे यांच्यापुढे सुनावणी झाली. या प्रकरणी सुनावणीकामी अर्जदार राजापूर अर्बन बँकेतर्फे , मुख्य कार्यकारी अधिकारी, शेखरकुमार अहिरे, संचालक जयंत अभ्यंकर, अॅड. शशिकांत सुतार, सल्लगालर शैलेश कोतमिरे, गणेश निमकर व सनदी लेखापाल संजय पवार हे उपस्थित होते. तसेच मे. संजय मालपाणी अॅन्ड असोसिएट्स्च्या सनदी लेखापाल यांच्या वतीने अॅड. अमोल देशपांडे, कायदेशीर सल्लागार व श्रीमती रंजना मालपाणी (सीए), श्री. संजय मालपाणी (सी.ए) भागीदार म्हणून उपस्थित होते.
या दोन्ही गटांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर सहकार आयुक्त व सहकार निबंधक सहकारी संस्था पुणेचे दिपक तावरे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूर जि. रत्नागिरी या बँकेस सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक यांनी दिलेला “ड “वर्ग यामध्ये सुधारणा करुन “ब “वर्ग देण्यात येत आहे असा आदेश दिला आहे.
या निर्णयामुळे राजापूर अर्बन बँकेला दिलासा मिळाला असून आरबीआयकडेही हा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे ओगले व अहिरे यांनी सांगितले.











