कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांचे आदेश
विकास कामात दिरंगाई आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
रत्नागिरी (प्रतिनिधी) – भगवतीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रगती प्रमोद भोसले यांना सरपंचपदावरून काढून टाकण्यात आले आहे. तसे आदेश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यांनी दिले आहेत.
हि कारवाई महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार आली असून प्रशासकीय अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ९ सप्टेंबर २०२५ रोजी हा आदेश पारित करण्यात आला.
या प्रकरणी ग्रामस्थ राजेंद्र सखाराम आखाडे आणि उपसरपंच श्रेया श्रीकांत राजवाडकर यांनी इतर ४ सदस्यांसह तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. या चौकशीत सरपंचांवर चार प्रमुख आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये भगवतीनगर अंतर्गत वसंतराव नाईक तांडा वस्ती योजनेमधून मंजूर झालेल्या धनगरवाडी मुख्य रस्ता ते सोमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात हेतुपुरस्सर विलंब केला. सरपंचांचे पती प्रमोद भोसले ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप होता. ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र मालप यांना कोणतीही नोटीस न देता कामावरून कमी करण्यात आले. तसेच, गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांना कामावर परत रुजू करून वेतन देण्याचे आदेश दिले असतानाही, सरपंचांनी त्यांचे पालन केले नाही. तसेच सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये मंजूर झालेल्या विकास कामांसाठी मिळालेला निधी खर्च न करता तसाच ठेवला. मंजूर कामांपैकी फक्त ३ कामे पूर्ण झाली. त्यामुळे गावाचा विकास थांबला या आरोपांच्या अनुषंगाने सरपंच सौ. प्रगती भोसले यांच्यावर हि कारवाई करण्यात आली.
या कारवाई नंतर भगवती नगर ग्रामपंचायत सरपंचपदाचा कार्यभार विद्यमान उपसरपंच श्रेया राजवाडकर यांच्याकडे तात्पुरता सोपवण्यात आला आहे.










