खेड (प्रतिनिधी) : लायन्स महाराष्ट्र राज्य (मल्टिपल 3234)च्या 2026-27 या वर्षासाठी राज्य सचिवपदी कोकणातील लायन डॉ. विरेंद्र विद्याधर चिखले यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. खेडसह संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या या निवडीमुळे लायन्स क्लब खेडला प्रथमच राज्य पातळीवरील महत्त्वाचा सन्मान मिळाला आहे.
रविवार दि. 17 एप्रिल रोजी पुणे येथे महाराष्ट्रातील 500 हून अधिक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य राज्य लायन्स कॉन्फरन्स पार पडली. या परिषदेत 2026-27 वर्षासाठी राज्य (मल्टिपल) अध्यक्षपदी नागपूर येथील लायन भरत बलघट यांची निवड करण्यात आली, तर सचिवपदी डॉ. विरेंद्र चिखले यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
या कॉन्फरन्समध्ये प्रांतपाल म्हणून डॉ. विरेंद्र चिखले यांच्या नेतृत्वाखाली सात जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आलेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची विशेष दखल घेण्यात आली. विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि सेवा उपक्रमांबद्दल प्रांताला तब्बल 64 पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तसेच लायन्स क्लब खेडलाही वैयक्तिक आणि क्लब स्तरावर मिळून एकूण 12 पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
मल्टिपल कॉन्सिल चेअरपरसन लायन विजय सारडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या भव्य कार्यक्रमाला नागपूरचे महाराज मुधोजीराजे भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. डॉ. विरेंद्र चिखले यांच्या निवडीमुळे खेड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













