अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद
दापोली (वार्ताहर) – दापोली तालुक्यातील प्रसिद्ध कर्दे समुद्रकिनारी पुन्हा एकदा पर्यटकांच्या बेफाम कृत्याचा थरार समोर आला आहे. काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास समुद्रकिनारी भरधाव वेगाने थार गाडी चालविण्याचा प्रकार घडला. गाडीचालकाचा ताबा सुटल्याने थार गाडी अचानक उलटली आणि या प्रकाराची संपूर्ण दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहेत.गुरुवार 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला
समुद्रकिनारी वाहनांना अशा पद्धतीने वेगाने चालविणे हे केवळ बेकायदेशीर नसून अत्यंत धोकादायक देखील आहे. या प्रकारामुळे केवळ गाडीत बसलेल्या व्यक्तींचा जीव धोक्यात येत नाही, तर किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांच्या सुरक्षिततेलाही गंभीर संकट निर्माण होते. या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा बेपर्वा पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र काही बेपर्वा पर्यटकांच्या कृत्यामुळे अपघातांचा धोका वाढत असून पर्यावरणालाही हानी पोहोचते. अनेक वेळा याबाबत तक्रारी नोंदवूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचे नियम काटेकोरपणे राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे. स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी पोलिस प्रशासन व पर्यटन खात्याला कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.











