धक्कादायक बातमी ! दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू
फूड पॉयझनिंगची शक्यता
दापोली (विशेष प्रतिनिधी) – ख्रिसमसच्या सुट्टीसाठी कुटुंबासह कोकणात पर्यटनासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा दापोली तालुक्यात अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आंचल मदन सकपाळ असे मृत मुलीचे नाव असून ती मुंबई–कल्याण येथील रहिवासी होती. आनंदासाठी सुरू झालेला हा प्रवास काही तासांतच शोककाळ ठरल्याने सकपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
२५ डिसेंबर रोजी सकपाळ कुटुंब दापोली तालुक्यातील आंजर्ले परिसरातील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी आले होते. समुद्रकिनारा आणि निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर शनिवारी सकाळी परतीच्या प्रवासाची तयारी सुरू असताना पालकांनी आंचलला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती शुद्धीवर नसल्याचे आणि तिचे शरीर थंड पडल्याचे लक्षात येताच कुटुंबीय घाबरले. तातडीने स्थानिकांच्या मदतीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पुढे दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी आंचलला मृत घोषित केले.
आंचल ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील सेंट थॉमस विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी रात्री जेवणानंतर ती आनंदात खेळली होती आणि कोणतीही तक्रार नसताना झोपली होती. मात्र सकाळी ती पुन्हा उठलीच नाही, ही बाब कुटुंबीयांसाठी अधिक वेदनादायक ठरली आहे. एकुलती एक मुलगी अचानक हिरावून गेल्याने नातेवाईक आणि मित्रपरिवार अक्षरशः कोलमडून पडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रिती शिर्के, नगरपंचायत अभियंता सुनील सावके, निवृत्त शिक्षक रमाकांत शिगवण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर आणि सहाय्यक निरीक्षक यादव यांनीही रुग्णालयात भेट देत घटनेची माहिती घेतली. आंचलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार अन्नातून विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण निश्चित होणार आहे. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत असून फूड अँड ड्रग्स प्रशासनाची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.
खेड, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.














