चिपळूणच्या प्रवाशांची होतेय गैरसोय- शौकत मुकादम
चिपळूण (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे रेल्वेच्या डब्याचे दरवाजे आतून बंद केले जातात त्यामुळे चिपळूणमध्ये आरक्षणची तिकीट असणाऱ्या प्रवाशांनासुद्धा आतमध्ये बसता येत नाही. त्यामुळे आरक्षित केलेल्या लोकांचे पैसे नाहक फुकट जात आहेत. याची चौकशी व्हावी व रेल्वे डब्याचे दरवाजे आतून बंद करणाऱ्यावर रेल्वे आर.पी.एफ पोलिसांनी कार्यवाही करावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, दिनांक ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ३.२० मिनिटांनी मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस हे चिपळूण रेल्वे स्थानकावर आली असता त्या गाडीचे दरवाजे आतून बंद करण्यात आले होते. यामुळे आरक्षण केलेले सर्व प्रवासी चिपळूण रेल्वे स्थानकावरच राहिले. असे असताना प्रवाशांनी सदर घटना आरपीएफ पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु आरपीएफ पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली, असे प्रकार वारंवार घडत आहेत. मग आर.पी.एफ पोलीस झोपा काढत आहेत का? अशा प्रवाशांच्या तक्रारी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीकडे आल्या आहेत व तसे समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे. दि. ३ सप्टेंबर रोजी मांडवी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाली. तिचे दरवाजे आतून बंद केलेले असल्यामुळे चिपळूण येथील प्रवासी प्रभाकर सैतवडेकर यांच्यासह अनेक प्रवासी आरक्षण असून सुद्धा लहान मुलांसोबत चिपळूण रेल्वे स्टेशनवरच राहिले. रेल्वे डब्याचे दरवाजे आतून बंद करणे हे कायद्याने गुन्हा आहे.यापुढे रेल्वे प्रशासने याकडे त्वरित लक्ष घालावे अन्यथा आम्हाला त्याठिकाणी येऊन दरवाजे उघडावे लागतील, असा इशारा शौकत मुकादम यांनी दिला आहे.













