खेड – (प्रतिनिधी)
रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये 10 सप्टेंबर रोजी माजी विद्यार्थी अथर्व सावंत यांचे इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी त्यांचे रोपटे व पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत केले.
अथर्व सावंत हे रोटरी स्कूलचे माजी विद्यार्थी असून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान अमेरिकेतील एम.आय.टी. येथील मॅक गव्हर्न इन्स्टिट्यूट फॉर ब्रेन रिसर्चमध्ये काम केले आहे. सध्या ते सॅनफ्रॉन्सिस्को येथील मेफिल्ड कंपनीत ॲनॅलिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सेमिनारदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व, स्पर्धा परीक्षा व विविध उपक्रमांमधून शिकण्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच यश मिळते, असे सांगत त्यांनी परदेशातील शिक्षणाच्या संधींबद्दलही माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी अथर्व सावंत यांचे कौतुक करत प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येयपूर्तीकडे वाटचाल करावी, छंद जोपासावेत आणि जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भक्ती करंबेळकर यांनी केले.










