जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत रोटरी स्कूलचे वर्चस्व

खेड – (प्रतिनिधी)
रत्नागिरीतील मारुती मंदिर शिवाजी स्टेडियम येथे 9 व 10 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आणि क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धेत अनेक शाळांचा सहभाग होता. त्यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ करून आपले वर्चस्व सिद्ध केले. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात अनुष्का लेंढे व सान्वी थोरात यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. 19 वर्षांखालील मुलांच्या गटात साईराज पवार, जय खाडे, वरद देवघरकर, शुभम पाटील व दर्श संसारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
याशिवाय 14 वर्षांखालील मुलींच्या गटात झरीन अत्तार, 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सान्वी थोरात, 17 वर्षांखालील मुलांच्या गटात श्वेतांग भांड आणि 19 वर्षांखालील मुलांच्या गटात साईराज पवार यांची सांगली येथे होणाऱ्या विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण व शितल घाणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.