खेड (प्रतिनिधी) राकेश कोळी – जेसीआय खेडतर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा जेसी सप्ताह यंदाही उत्साहात पार पडला. या निमित्ताने खेड व परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा जेसीआय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे हा सोहळा संपन्न झाला.

जेसी पुरस्कार २०२५ मध्ये क्रीडा क्षेत्रातील योगामध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कुमार पवन चिखले, सहकार क्षेत्रासाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था सीईओ स्वप्ना यादव, उद्योग क्षेत्रासाठी फॅबकॉन इंजिनिअरिंग वर्क्सचे श्री. शेखर तलाठी, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. साधना धरिया, शैक्षणिक कार्यासाठी अहमदभाई मुकादम तसेच सामाजिक क्षेत्रासाठी रमेश उर्फ बावशेठ चव्हाण यांचा विशेष गौरव करण्यात आला. या मान्यवरांना जेसीआय गौरव पुरस्कार सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात जेसीआय खेडचे माजी अध्यक्ष विरेंद्र चिखले, जे सध्या लायन्स क्लब डिस्टिक गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात केला. या सोहळ्यादरम्यान रोटरी, समर्थ कृपा विद्यालय, एलटीटी व नवभारत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रंगतदार नृत्याविष्कार सादर केले. त्याचप्रमाणे ॐ साई डान्स अकॅडमीच्या कलाकारांनीही नृत्य सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआय इंडिया विभाग ११ चे विभागीय अध्यक्ष जेएफडी शाबा गावस उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात जेसीआय खेडच्या उपक्रमांचे कौतुक करताना, “जेसीआय ही प्रशिक्षणाभिमुख संस्था असून महाराष्ट्रातील अधिकाधिक ठिकाणी तिची स्थापना व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन केले.
जेसीआय खेडचे अध्यक्ष जेएफडी अमर दळवी यांनी स्वागतपर भाषण केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, जेसीआय खेड गेली ४३ वर्षे सातत्याने कार्यरत असून प्रत्येक वर्षी खेडकरांसाठी नवे उपक्रम घेऊन येते. आगामी वर्षी नव्या जागेत जेसी फेस्टिवल भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला झोन ११ चे माजी अध्यक्ष जेएफडी अतुल गोंदकर, रोटरी क्लब अध्यक्ष मंदार संसारे, लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनिल सदरे, न्यानदीप चेअरमन अरविंद तोडकरी, रोटरी स्कूल चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच चिपळूण नागरी पतसंस्था, रोटरी क्लब खेड, एलटीटी स्कूलचे पदाधिकारी, बाबाशेट मित्रमंडळाचे सभासद, पत्रकार बंधू, जेसीआय अलुमनी महाराष्ट्र रिजनल चेअरमन, जेसीआय खेडचे माजी अध्यक्ष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माजी विभागीय अध्यक्ष जेसीआय सेनेटर अमोल शिरसागर यांनी केले. तर कार्यक्रम प्रमुख म्हणून जेसी अमित नामुष्टे यांनी यशस्वी आयोजनाची धुरा सांभाळली.











