प्रशासनाकडून कागदी घोडे नकोत ठोस कार्यवाईची अपेक्षा
प्राणी प्रेमी, गो रक्षकांनीही पुढाकार घेण्याची गरज
राजापूर | प्रतिनिधी राजापूर शहरासह मुंबई गोवा महामार्ग तसेच सागरी महामर्गासह ग्रामीण भागातील अनेक राज्य व जिल्हा मार्गावरिल मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. या मोकाट गुरांमुळे अपघातांचा गंभीर धोका निर्माण होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर यात ही गुरेही जखमी होत असल्याने त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. या विरोधात राजापुरातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी आवाज उठवत प्रशासनाकडे निवेदन देत या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. याची दखल घेत संबधित विभागांनी नगर परिषदेसह महामार्गालगत असलेल्या ग्रामपंचायतींना पत्र देऊन याबाबत माहिती पाठविणे व कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र अशा प्रकारे कागदी घोडे नाचवून व एकमेकांवर जबाबदारी ढकलून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी ठोस कार्यवाहीची आवश्यकता आहे.
मुंबई गोवा महार्गावर राजापूर तालुक्यात वाटूळ पासून ते पुढे हातिवले टोलनाका ते पन्हळे टाकेवाडी खारेपाटण पर्यंत मोठया प्रमाणावर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे वारंवार अपघात होत आहेत. यात मुकी जनावरे जखमी होत आहेत व मृत्युमुखीही पडत आहेत. तर अपघात होऊन वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवीतासही मोठा धोका निर्माण होत आहे. यासाठी या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशा प्रकारे गुरे मोकाट सोडणाऱ्या गुरे मालकांवर कारवाई करावी व महामार्गावरिल प्रवास हा सुरक्षित करावा यासाठी हातिवले टोल नाक्यावर स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, वाहन चालक व राजापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत प्रशासनाचे लक्ष वेधले. अशा प्रकारे आपली गुरे मोकाट सोडून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या गुरे मालकांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे एक लेखी निवेदन स्थानिक ग्रामस्थ, रिक्षा संघटना यांच्या वतीने महामार्ग विभागाचे अधिकारी व राजापूर पोलीसांना देण्यात आले.
यानंतर तालुक्यातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुखांना भेट देत ठोस निवेदन सादर केले. राजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य व जिल्हा मार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणारा मोकाट गुरांचा प्रश्न आता गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे.. रस्त्यावर येणाऱ्या गुरांमुळे अपघातांची मालिका सुरू असून अनेक नागरिकांचा जीव गेला आहे, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि मुक्या जनावरांचाही बळी गेला आहे. असे नमुद करत याबाबत ठोस पाऊलें उचलावीत अशी मागणी केली आहे. राजापूर शहरात तसेच महामार्गावर अनेक ठिकाणी कळपाने गुरे बसत आहेत. रात्री अपरात्रीही ही गुरे बसलेली असतात व त्यात भरधाव वेगात येणारी वाहने धडक देऊन निघून जातात असेही चित्र पहावयास मिळत आहे.
यामुळे हा प्रश्न किती गंभीर झाला आहे याची प्रचिती आली आहे. अशा प्रकारे गतसप्ताहात देण्यात आलेल्या या निवेदनांनंतर प्रशासनाला जाग आली असून आता प्रशासनाने कागदी घोडे नाचविण्यास सुरूवात केली आहे. यावर सोमवारी १० सप्टेबर रोजी कार्यकारी अभियंता महामार्ग विभाग यांनी महामार्गालत असलेल्या ग्रामपंचायत व राजापूर नगर परिषदेला तात्काळ लेखी पत्र देत अशा प्रकारे मोकाट गुरे सोडणाऱ्या गुरे मालकांची माहिती पोलीसांकडे द्यावी असे आवाहन केले आहे. तर पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवेदनानंतर गटविकास अधिकारी सर्व ग्रामपंचायतींना ११ सप्टेंबर रोजी एक लेखी पत्र दिले आहे. राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दी मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ व इतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे येत असून त्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन मनुष्यहानी तसेच जनावरांची जीवितहानी होत आहे. याबाबत वरील संदर्भानुसार सहा. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, खारेपाटण यांनी राजापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने संबंधित मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे नोंदवण्यासाठी महामार्गावर व इतर रस्त्यांवर आढळणाऱ्या मोकाट जनावरांच्या मालकांचा तपशील व दोन पंच देण्याबाबत ग्रामपंचायतींना विनंती केली आहे. तरी वरील प्रमाणे माहिती राजापूर पोलीस प्रशासनास देणेबाबत आपणाकडून सहकार्य करण्यात यावे तसेच ग्रामपंचायतीमधील पशुपालकांना जनावरे मोकाट न सोडण्याबाबत लेखी स्वरुपात अवगत करावे व जनावरे मोकाट सोडल्याचे आढळल्यास संबंधित प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईस पशुपालक स्वतः जबाबदार राहतील हे अवगत करावे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रांमधील सर्व पशुपालकांच्या सर्व पहुंचे ear tagging म्हणजेच कानातील बिल्ले नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून करून घेणेबाबत समज देण्यात यावी व पशुंची खरेदी विक्री झाल्यास, मृत्यू झाल्यास, नवीन पशुंचा जन्म झाल्याची नोंद किंवा कानातील बिल्ला पडले असल्याबाबतची माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे वेळोवेळी देण्याबाबत समज द्यावी, जेणेकरून पशुंची माहिती अद्ययावत राहील. असे कळविले आहे.
या दोन्ही विभागांनी आलेल्या निवेदनावर अशा प्रकारे ग्रामपंचायतींना कळवून कार्यवाही आंम्ही कार्यवाही सुरू केली आहे हे तरी सध्या दाखविले आहे. मात्र अशा प्रकारे केवळ पत्र पाठवून, ग्रामपंचायतीं व पोलीस प्रशासनावर ढकलुन हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी ठोस कार्यवाही व उपाययोजनांची गरज आहे. यासाठी स्थानिक पातळीवर जागृती करतानाच गो रक्षकांनाही विश्वासत घेऊन यावर उपाययोजना केली पाहिजे. महामार्गावर व काही रस्त्यांवर अनेक वेळा अशा प्रकारे ठाण मांडून बसलेल्या गुरांना उठवून बाजुलाही अनेक जण करताना पहावयास मिळते, त्या मुक्या जनावरांप्रती असलेले प्रेम यातुन दिसून येते. बजरंग दलाच्या वतीनेही अशा काही मोकाट गुरांच्या गळयात रेडियमचे पट्टे बांधले होते. जेणेकरून रात्रीच्या लाईटवर ते चमकतात व वाहन चालकांनीही समजून येते त्यातुन अपघात टळतात व गुरांचाही जीव वाचतो. अनेक प्राणी प्रेमी गो रक्षक अशा अपघातात जखमी झालेल्या गुरांवर उपचार करतात. ग्रामीण भागात शेती करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे आज पशुधनही कमी होत आहे, जे आहे ते जपण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, अपघात टळले पाहिजेत त्यामुळे भविष्यात या मोकाट गुरांच्या प्रश्नी ठोस कार्यवाहीची आवश्यकता आहे हे मात्र नक्कीच. केवळ कागदी घोडे नाचवून जबाबदारी झटकता येणार नाही.













