सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या गणरायाला भक्तिपूर्ण निरोप

ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं थाटामाटात विसर्जन!

सावंतवाडी । प्रतिनिधी : सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सण-उत्सवांमध्ये दिवसरात्र गस्त घालणाऱ्या सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सोमवारी आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला. ढोल-ताशांच्या गजरात, बेंजोच्या तालावर नाचत पोलिसांनी १९ व्या दिवशी बाप्पाची मिरवणूक काढली. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” अशा जयघोषाने मोती तलावाचा परिसर दुमदुमून गेला होता.

इतरांचा गणपती सुखकर व्हावा म्हणून प्रसंगी घरचा गणपती विसरून दिवसरात्र सेवा देणाऱ्या पोलीसांचा १९ दिवसांचा सार्वजनिक गणपती मात्र नेहमीच कौतुकाचा विषय ठरला आहे. त्यातही या गणपतीची विसर्जन मिरवणूक म्हणजे या पोलीस बांधवांसाठी पर्वणीच ठरते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडी पोलीस ठाण्यात गणरायाची १९ दिवसांसाठी स्थापना करण्यात आली होती. पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या श्रद्धेने बाप्पाची सेवा केली. इतर सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर आणि २१ दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनापूर्वी १९व्या दिवशी या गणपतीचे विसर्जन होते.

रविवारी संध्याकाळी फुलांनी सजवलेल्या रथातून बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. मिरवणुकीमध्ये पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, इतर पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. नेहमी गंभीर वातावरणात दिसणारे पोलीस यावेळी ढोल-ताशांच्या तालावर मनसोक्त नाचत होते. त्यांचा उत्साह आणि आनंद हे विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.

ही मिरवणूक पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन मोती तलावापर्यंत पोहोचली. यावेळी केवळ पोलीसच नव्हे, तर मोठ्या संख्येने नागरिकही बाप्पाला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. मोती तलावावर गणेशभक्तांच्या जल्लोषात आणि उत्साहात लाडक्या बाप्पाला भक्तिपूर्ण निरोप देण्यात आला.