सिंधुदुर्गातील माझ्या खात्यांतर्गत असलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : योगेश कदम 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : शिवसेना नेते उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडणार असून आपल्याकडे असलेल्या चारही खात्यांचा आढावा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आणि येथील माझ्या खात्याअंतर्गत येणारे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान त्यांनी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, महसूल, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, आणि अन्न व औषध प्रशासन ही चारही खाती ग्रामीण जनतेच्या जीवनाशी थेट निगडीत आहेत. या खात्यांच्या कामाचा तालुकानिहाय आढावा घेऊन स्थानिक प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहील.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. एक मंत्री म्हणून शिवसैनिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हे आपले कर्तव्य आहे. अनुभवी नेते केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वाळू चोरीच्या समस्येवरही लक्ष वेधले. वाळू चोरी थांबवण्यासाठी क्रश सॅन्डचा पर्याय वापरला जाईल. नवीन वाळू धोरण स्वीकारणे आणि वाळू चोरी प्रकरणी किती जणांवर कारवाई झाली, याचाही आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी आमदार दीपक केसरकर यांनी आंबोली, चौकुळ आणि गेळे येथील वन विभागाशी संबंधित प्रश्न वगळता इतर महसूल विभागाचे प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले. लवकरच उर्वरित प्रश्नही सोडवले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

या दौऱ्यात केसरकर यांनी मंत्री योगेश कदम यांचा विशेष सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख बबन राणे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.