मिर्ले येथे कातकरी तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत चौघांविरुद्ध गुन्हा

खेड | प्रतिनिधी :
खेड तालुक्यातील मिर्ले गावात कातकरी समाजातील मजूर तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील गंभीर कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना 11 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. फिर्यादी अमीर रविंद्र निकम (वय 26, रा. खोपी, लक्ष्मीनगर, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांसह बिजघर, कातकरवाडी येथे नवरात्रोत्सवाच्या मंडप सजावटीच्या कामावर मोटारसायकलने जात होते. त्यावेळी मिर्ले, बौद्धवाडी परिसरात रस्त्यावर प्रणित प्रमोद साळवी, केतन प्रमोद साळवी, नंदेश साळवी व नरेश साळवी हे उभे होते. त्यांनी हात दाखवून अमीर यांची मोटारसायकल थांबवली.
अमीर निकम हे खाली उतरले असता, प्रणित साळवी याने त्यांना ‘तु कातकरी आहेस, तुला घरात येऊन मारतो’ अशी जातिवाचक शिवीगाळ करत जोरदार धक्का दिला. त्यामुळे अमीर हे रस्त्यावर पडले. त्यानंतर प्रणित साळवी याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. तसेच केतन, नंदेश आणि नरेश या तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात अमीर निकम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. उपचारानंतर डिस्चार्ज मिळताच त्यांनी खेड पोलिस ठाण्यात हजर राहून तक्रार नोंदवली.

पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून प्रणित प्रमोद साळवी, केतन प्रमोद साळवी, नंदेश साळवी व नरेश साळवी (सर्व रा. मिर्ले, ता. खेड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118(1), 126(2), 352, 351(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2), 3(v) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.