रत्नागिरी ः प्रतिनिधी
विद्युत साहित्य वितरणाच्या व्यवसायातील कामगाराने वसूल केलेली रक्कम व काही विद्युत साहित्य दुकानदारांना न देता परस्पर लांबवून तब्बल 4 लाख 67 हजार 44 रुपयांची फसवण्ाूक केली. फसवणूकीची ही घटना डिसेंबर 2024 ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीत मारुती मंदिर रोडवरील के.एस.पी अॅलेक्सा अपार्टमेेंटमधील स्मित इलेक्ट्रिकल्समध्ये घडली.
परेश महादेव बापर्डेकर (30,रा.कातळवाडी कोंड्ये लांजा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात दुकान मालक अमरेश सुरेश पावसकर (42,रा.संखेश्वर मधूबन बोर्डिंग रोड माळनाका,रत्नागिरी) यांनी शनिवार 13 सप्टेंबर रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित परेश बापर्डेकर हा फिर्यादी अमरेश पावसकर यांच्या स्मित इलेक्ट्रिकल्समध्ये विद्युत साहित्य वितरणाच्या व्यवसायात काम करत होता. डिसेंबर 2024 ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीत त्याने फिर्यादीच्या व्यवसायातील विद्युत साहित्य वितरीत केलेल्या दुकानदारांकडून वसूली केलेली रक्कम व काही विद्युत साहित्य दुकानदारांना न पोहचवता परस्पर लांबवत स्वतःच्या फायदासाठी वापरली. ती परत करण्यासाठी फिर्यादीने त्याला मुदत देउनही त्याने ती अद्याप परत केलेली नाही. त्यामुळे फिर्यादीने शनिवारी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली












