रत्नागिरी पोलिसांच्या ‘RAIDS App’ची कमाल; नागपूरमधील अज्ञात मृतदेहाची ओळख अवघ्या २ तासांत पटली

रत्नागिरी: आधुनिक तंत्रज्ञान आणि दोन जिल्ह्यांमधील पोलीस समन्वयाचे एक उत्कृष्ट उदाहरण नुकतेच समोर आले आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित करण्यात आलेल्या ‘RAIDS App’ च्या मदतीने नागपूर जिल्हा पोलिसांना एका क्लिष्ट प्रकरणात मोठे यश मिळाले आहे.

नागपूर येथील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जंगलमय परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत असतानाच, नागपूर पोलिसांनी तातडीने रत्नागिरी पोलिसांशी समन्वय साधला. रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेल्या RAIDS App च्या सहाय्याने मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण (Photo Reconstruction) करण्यात आले. या अत्याधुनिक तांत्रिक प्रक्रियेचा सकारात्मक परिणाम असा झाला की, अवघ्या २ तासांच्या आत त्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

तपासानुसार, सदर मृत व्यक्ती ही नागपूरमधील दौलामेटी (आठवा मैल) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचे उत्तम उदाहरण मानली जात असून, यामुळे तपास प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे आता सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.