रत्नागिरी ः प्रतिनिधी
तीन दिवसांपूर्वी दापोली पोलिस ठाणेहद्दीतील कर्दे येथील समुद्रकिनारी महिंद्रा थार गाडी वेगाने वळणे घेत चालवताना उलटून अपघात झाला. त्यामुळे रत्नागिरी पोलिस दलामार्फत सर्व नागरिकांना व पर्यटकांना समुद्रकिनारी वाहन चालवण्यास मनाई बाबत आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवार 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा.सुमारास दापोली पोलिस ठाणे हद्दीमधील कर्दे येथील समुद्रकिनारी अज्ञात चालक आपल्या ताब्यातील महिंद्रा थार त्या समुद्रकिनारी धोकादायक पध्दतीने, अति वेगाने वळणे घेत वाहन चालवत होता. त्यावेळी वाहनावरील ताबा सूटल्याने अपघात घडला व वाहन उलटून चालकासह तेथील असणार्या पर्यटकांच्या जिवितास गंभिर धोका निर्माण झाला. या प्रकरणी दापोलि पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द समुद्रकिनारी धोकादायक पध्दतीने वाहन चालवल्या बद्दल भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 110,281,125 व मोेटार वाहन कायदा कलम 184,134,177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या संदर्भात रत्नागिरी जिल्हा पोलिस दलामार्फत सर्व नागरिक व पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे कि, समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारची वाहने चालवू नयेत. समुद्रकिनारी वाहन चालवणे धोकादायक असून अपघातास कारणीभूत ठरु शकते,वेगाने किंवा निष्काळजीपणे वाहन चालविणार्यांविरोधात रत्नागिरी पोलिस दलामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल. समुद्रकिनारी येणारी लहान मुले, जेष्ठ नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेस बाधा पोहचणार नाही याची दक्षत घ्यावी. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे व अशाप्रकारे कोणी समुद्रकिनारी नियमभंग करुन धोकादायक वाहन चालवताना आढळून आल्यास आपल्या जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा डायल 112 वर कळवण्यात यावे.













