खेड | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचा ५८ वा युवा महोत्सव सध्या अंतिम टप्प्यात सुरु असून विविध कलात्मक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आपले कौशल्य सादर करत आहेत. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या भारतीय शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेत घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष संगणक-एआयएमएल शाखेचा विद्यार्थी कुमार गंधार दिलीप संकपाल याने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले आहे.
गंधार संकपालच्या या यशामागे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे तसेच संगणक-एआयएमएल शाखेच्या शिक्षकवृंदाचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धेची झोनल फेरी खेड येथे २५ ऑगस्ट रोजी पार पडली होती. त्या झोनल फेरीतून निवड होऊन गंधार संकपाल याने अंतिम फेरीत मुंबई विद्यापीठात आपली छाप पाडली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, रजिस्ट्रार प्रा. संदीप मुघाटे यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गंधार संकपालचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या कामगिरीमुळे घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाने युवा महोत्सवाच्या व्यासपीठावर आपली छाप उमटवली असून गंधार संकपालने आपल्या परिश्रमाने व कलागुणांनी महाविद्यालयाचे नाव गौरवले आहे.












