राजापूर अर्बन बँकेची रविवारी २८ सप्टेंबर रोजी १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

राजापूर प्रतिनिधी: सर्वसामान्यांची जिव्हाळयाची बँक अशी ओळख असलेल्या येथील राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूरची आर्थिक वर्ष सन २०२४-२५ ची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सकाळी ९.३० वाजता बँकेचे अध्यक्ष संजय पांडुरंग ओगले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.
या सर्वसाधाण सभेत रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या १०३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृतांत वाचून कायम करणे, सन २०२४-२५ वा आर्थिक वर्षाच्या बँकेच्या कामकाजाचा अहवाल, लेखापरीक्षित ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चासह मंजूर करणे, कायदा व नियम यांस अनुसरुन सन २०२४-२५ सालचे नफा विभागणीस मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे, सन २०२५-२६ सालचे अंदाजपत्रकास मान्यता देणे, सन २०२४-२५ चा वैधानिक लेखापरिक्षक यांचा अहवाल दोष दुरुस्ती अहवाल वाचून नोंद घेणे, संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्या कर्जाच्या माहितीची नोंद घेणे, रिझर्व्ह बँकेच्या पूर्व मान्यतेनुसार सन २०२५-२६ सालाकरीता वैधानिक लेखापरिक्षक यांच्या नेमणूकीस मान्यता देणे व त्यांचा मेहनताना ठरविणे, बँकेचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता अंतर्गत लेखा परिक्षक व आवर्ती लेखा परिक्षक, व्ही.ए.पी.टी. आय.एस. लेखापरिक्षक यांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे, बँकेच्या वार्षिक विकास आराखड्यास व दीर्घ मुदती विकास आराखड्यास मंजुरी देणे, या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थितीत असलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस तथा रजेला क्षमापीत (Condone) करणे व अध्यक्ष महाशय यांचे परवानगीने आयत्यावेळी येणा-या कामांचा विचार करणे या विषयांवर चर्चा होणार आहे.
सदर सभेस गणसंख्ये अभावी सभा तहकूच झाल्यास सदरची सभा त्याच दिवशी त्याच विषयांवर त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर १०.०० वाजता घेण्यात येईल. त्यास गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही.
अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद व सभेच्या सुचनेमधील विषयाबाबत सभेमध्ये काही प्रश्न विचारावयाचे असल्यास सभासदांनी दि. १८/०९/२०२५ पर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवाव्यात. वरील बाचतीत काही माहिती हवी असल्यास कार्यालयीन वेळेत मिळेल.
वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या सर्व शाखांमधून तसेच बँकेचा वार्षिक अहवाल बैंकेचे संकेतस्थळ www.rajapururbanbank.com वर उपलब्ध आहे.
या सभेला सर्व सभासदांना उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे कार्यकारी संचालक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी केले आहे.