‘
वनविभागाची त्रेधातिरपीट
बांदा : प्रतिनिधी
गेले चार दिवस नेतर्डे परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या ओंकार हत्तीने मध्यरात्री मुंबई गोवा महामार्गावरील पत्रादेवी येथील सीमा तपासणी नाक्यानजीक हजेरी लावली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तत्पूर्वी रात्री हत्तीने फकीरफाटा येथील मराठी शाळेच्या आवारात बस्तान मांडत तेथील केळी बागायतीची नासधूस केली. हत्तीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वनविभागाच्या पथकाला गर्दीवर नियंत्रण मिळविताना नाकीनऊ आलेत.
काल दिवसभर ओंकारचा वावर नेतर्डे डोंगरपाल डिंगणे परिसरात होता. रात्री तो येथील शाळेच्या आवारात दाखल झाला. तब्बल दोन तास त्याचा याठिकाणी वावर होता. त्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. बांदा डिंगणे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
माध्यरात्री त्याने मुंबई गोवा महामार्ग गाठत पत्रादेवी तपासणी नाका पार केला. याठिकाणी असलेल्या वनखात्याच्या चौकीजवळील जंगलात त्याचा वावर आहे. सिंधुदुर्ग व गोवा वनखात्याचे पथक त्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत.












