घारपी-फुकेरीत बीएसएनएल 4G सेवा सुरू

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नाने बहुप्रतीक्षित मागणीची पूर्तता

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मिळणार डिजिटल कनेक्टिव्हिटीचा लाभ

बांदा : प्रतिनिधी
सह्याद्रीच्या दुर्गम भागातील घारपी आणि फुकेरी या गावांतील ग्रामस्थांची बहुप्रतीक्षित बीएसएनएलची 4G मोबाईल टॉवरची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून परिसरातील 4G सेवा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर तोडगा निघाला आहे.

मोबाईल नेटवर्क अभावी या भागातील नागरिकांना दैनंदिन संपर्कासोबतच विविध ऑनलाइन सेवांचा वापर करताना अडचणी येत होत्या. विशेषतः विद्यार्थ्यांना ऑनलाइन शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक व्हिडिओ, डिजिटल अभ्यासक्रम, ऑनलाइन परीक्षा व विविध शैक्षणिक उपक्रम यांचा लाभ घेण्यासाठी अडथळे येत होते. आता 4G सेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. दुर्गम भागातील शिक्षणाला त्याचा मोठा हातभार लागणार आहे.
तसेच शासकीय ऑनलाइन सेवा, बँकिंग व्यवहार, आरोग्यविषयक संपर्क, डिजिटल व्यवहार आणि विविध महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेणे ग्रामस्थांना सुलभ होणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
घारपी व फुकेरी ग्रामस्थांच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. यासाठी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री ना. नितेश राणे, आ. दीपक केसरकर, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, दोडामार्ग उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांचे सहकार्य मिळाले. बऱ्याच वर्षांच्या मागणीची पूर्तता झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.