सावंतवाडी : दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी वारंवार गुन्हे दाखल झालेल्या प्रवीण पुरुषोत्तम देऊळकर (वय ३४, रा. घर नं. १८२, कळसुकर शाळेच्या मागे, जुना बाजार, सावंतवाडी) याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. गोवा राज्यातील मोपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या नियोजित निवासस्थानी त्याला पोलिस बंदोबस्तात सोडण्यात आले.
देऊळकर याच्यावर २०२१ पासून दारू वाहतुकीचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्याची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, पोलिस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विनोद कांबळे यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर देऊळकर याला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश प्राप्त झाला. या आदेशानुसार, आज, दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी हवालदार धुरी आणि पोलिस कॉन्स्टेबल भूषण भोवर यांनी देऊळकरला जिल्ह्याबाहेर सोडले आणि ही कारवाई पूर्ण केली.













