प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून परिसरात मोठे खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश अशोकलाल वद्या (वय ३१, राहणार गुरुनानक कॉलनी,गांधीनगर) हे रात्री रात्री ए-वन गल्लीतील कुमार पानपट्टी येथे दूध आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी रोहन अनिल हेगडे (वय २२) आणि करण दीपक हेगडे (वय २१, दोघे रा.झाडू गल्ली,गांधीनगर) यांनी विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
यानंतर मध्यरात्री १:५० वाजण्याच्या सुमारास म्हसोबा माळ येथे लक्ष्मी एजन्सी समोर फिर्यादी आपल्या भावासोबत गप्पा मारत उभा असताना आरोपी मोटरसायकल वरून आले. त्यावेळी ‘तुला खूप मस्ती आली आहे, तुला संपवून टाकतो’ अशी धमकी देत आरोपी रोहन हेगडे यांनी हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटावर सपासप तीन वार केले. गंभीर जखमी अवस्थेत फिर्यादीला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र गांधीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२), ३५१(२),३५२,३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम करत आहेत.













