सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट : वैभववाडी भाजपा आक्रमक

वैभववाडी पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना ग्रुपवर आमदार व खासदार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. पोस्ट टाकणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपाच्या वतीने पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना देण्यात आले आहे.

रेल्वे प्रवासी व इतर समस्याबाबत चर्चा करताना वैभववाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या ग्रुप वर खासदार व आमदार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या ग्रुपवर खासदार व आमदार यांच्याबाबत गेले काही महिने आक्षेपार्ह पोस्ट टाकली जात आहेत. त्यामुळे खासदार, आमदार यांची नाहक बदनामी केली जाते आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, माजी सभापती भालचंद्र साठे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल सरवटे, संजय चव्हाण, सुहास सावंत, राजेंद्र राणे, रोहन रावराणे, प्रकाश सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.