लिंगडाळ येथे घरासमोर ठेवलेली मोटरसायकल चोरीस

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

देवगड : प्रतिनिधी

लिंगडाळ गणपती मंदिरासमोरील विकास सहदेव रावले यांच्या घरासमोरील अंगणात ठेवलेली हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल चोरीस गेल्याची घटना बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० ते गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंगडाळ गणपती मंदिराजवळ राहणारे विकास सहदेव रावले यांनी त्यांची मोटरसायकल बुधवारी रात्री घरासमोरील अंगणात ठेवली होती. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अंगणातील मोटरसायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी देवगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार करत आहेत.