एमआयडीसी येथे एलसीबीची कारवाई
पुण्यातील दोन युवतींची सुटका
नेपाळी महिला ताब्यात
रत्नागिरी – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या अनैतिक देह व्यापाराचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका नेपाळी महिलेला अटक केली असून, ती पुणे येथील दोन महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय चालवत होती. या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला एमआयडीसी रत्नागिरी येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक बनावट ग्राहक (डमी गिऱ्हाईक) पाठवून सापळा रचला. मिरजोळे एमआयडीसी येथील प्लॉट ई-६९ येथे छापा टाकण्यात आला असता, ही कारवाई उघडकीस आली.
छाप्यामध्ये एक नेपाळी महिला पुणे येथील दोन महिलांकडून देहविक्री करवून घेत असल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी नेपाळी महिलेवर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. देहविक्रीच्या व्यवसायातून ताब्यात आलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली, ज्यात खालील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते:
* सपोनि. श्रीमती शबनम मुजावर
* श्रेणी पोउनि. संदीप ओगले
* पोहेकॉ. विजय आंबेकर (९०९)
* पोहेकॉ. दिपराज पाटील (१४०७)
* पोहेकॉ. विवेक रसाळ (२६२)
* पोहेकॉ. भैरवनाथ सवाईराम (१३६२)
* मपोहेकॉ. स्वाती राणे (१२१०)
* मपोहेकॉ. शितल कांबळे (१३०२)
* मपोकॉ पाटील (१३८१)
* पोना दत्ता कांबळे (१५३२)











