विकासाचे शिल्पकार ठरलेल्या राज्यातील ३२ अभियंते व कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान!

सिंधुदुर्गातील उप अभियंता अजित पाटील यांचा समावेश.

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

रस्ते, पूल, शासकीय इमारती आणि जनतेच्या जीवनाशी निगडित असलेली असंख्य कामे करणाऱ्या सर्वोत्कृष्ट अभियंत्यांचा सन्मान जाहीर केला आहे. विकास कामाला आकार देणारे हात म्हणजे अभियंते. त्यांच्या कष्ट, तांत्रिक कौशल्य आणि दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राचा विकासमार्ग सुकर झाला आहे. या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने घेत राज्यातील या विभागाच्या 32 अभियंते व कर्मचाऱ्यांची सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपअभियंता अजित पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

भारतरत्न सर. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर हा “अभियंता दिन” म्हणून साजरा केला जातो. यंदा सन २०२४-२५ या कालावधीतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या यादीत अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंता, उपअभियते, अभियंते, वास्तुशारद विद्युत शाखा आणि वास्तुशास्त्र शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांरी यांचा समावेश आहे.
सरकारचा हा निर्णय अभियंत्यांच्या कार्याला केवळ मान्यता देणारा नसून, “विकासाची स्वप्ने साकार करणाऱ्या हातांचा सन्मान” ठरणार आहे.