मिरजोळे-एमआयडीसीत अनैतिक व्यवसाय प्रकरण : नेपाळी महिला दोन दिवस पोलिस कोठडीत

चार महिन्यांपासून नेपाळी महिलेला राहण्यास देणाऱ्या प्लॉटमालकावर होणार कारवाई 

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथील ई-६९ या प्लॉटवर देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. हा प्लॉट सुनिलकुमार गणपत प्रभू (६०) यांच्या मालकीचा असून संशयित नेपाळी महिला गेल्या चार महिन्यांपासून येथे वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली आहे.

गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी सकाळी १०.३० वाजता छापा टाकून संशयित नेपाळी महिलेला ताब्यात घेतले. ती पुणे येथील दोन महिलांमार्फत हा व्यवसाय चालवत होती. पथकाने त्या दोन महिलांना देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्त केले.

संशयित नेपाळी महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, प्लॉट मालक सुनिलकुमार प्रभूची चौकशी करून त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.