महाराष्ट्राचे नेतृत्व करत मिळविले राष्ट्रीय प्रमाणपत्र
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळकवणे अडरेकरवाडी येथील कॅडेट अथर्व जनार्दन धुळप याने हिमाचल प्रदेश येथे आयोजित ‘नॅशनल वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी अँड ॲडव्हेंचर कॅम्प’मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराडच्या वतीने त्याची या राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पसाठी निवड झाली होती. दहा दिवस चाललेल्या या कॅम्पमध्ये देशभरातील एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते.
हिमाचल प्रदेशातील नामांकित ABVIMAS (Atal Bihari Vajpayee Institute of Mountaineering and Allied Sports) संस्थेच्या मार्गदर्शनाखाली वॉटर स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान अथर्व धुळपने महाराष्ट्राचे नेतृत्व करत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. कॅम्पमधील वॉटर स्पोर्ट्स प्रशिक्षण हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठ्या पॉंग धरणात (Pong Dam) पार पडले, तर ॲडव्हेंचर प्रशिक्षण घनदाट जंगल परिसरात घेण्यात आले. कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अथर्व धुळप ABVIMAS संस्थेकडून प्रदान करण्यात येणाऱ्या मेडल व राष्ट्रीय प्रमाणपत्रासाठी पात्र ठरला. अथर्वचे आ. शेखर निकम, जि. प.माजी विरोधी पक्ष नेते अशोकराव कदम, जि. प. सदस्य संजय कदम, खालिद पटाईत, रुपेश इंगवले आदी अनेकांनी अभिनंदन केले. अथर्व धुळपच्या या यशामुळे कळकवणे गावासह चिपळूण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












